मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा जगप्रसिद्ध किल्ला.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा जगप्रसिद्ध किल्ला - तटबंदीच्या ईशान्येला एक भग्न मंदिर आहे. 'चतुर्भुज मंदिर' हे त्याचे नाव. गाभाऱ्यात एका संपूर्ण पाषाणातून कोरलेली चतुर्भुज विष्णूची मूर्ती आहे पण मूर्तीची मोडतोड झाल्याने मंदिर वापरात नाही. देवाची पूजा होत नाही की देवासमोर दिवाबत्ती होत नाही. ग्वाल्हेर शहरात रहाणारे लोक तिकडे फिरकतही नाहीत - वास्तुशिल्प व कोरीवकामांचे अनेक चांगले नमुने आहेत शहरात मग काय पहायचे आहे ह्या पडक्या देवळामध्ये?

ह्या पडक्या देवळात विष्णूच्या मूर्तीच्या उजव्या हाताला एक शिलालेख आहे. आणि हा शिलालेख पहायला जगभरातून विदेशी पर्यटक (विशेषत: गणिती!) येतात. गणिती आणि शिलालेख पहायला? काहीतरी गफलत होतीये. पुरातत्त्वज्ञ म्हणायचे आहे का? नाही! गणिती म्हणजे गणिताचे अभ्यासकच म्हणायचे आहे मला! असं काय आहे त्या शिलालेखात की रुक्ष गणितींना त्यात रस असावा? बघूया आपण. त्या शिलालेखात लिहिलेले आहे की "संवत ९३३ मध्ये माघ शुक्ल द्वितीयेला हे मदिर बांधून पूर्ण झाले. [कोणी एक] अला नावाच्या व्यक्तीने दररोज ५० हार देवाला मिळावेत म्हणून २७० हात लांब आणि १८३ हात रुंद जमीन मंदिराला दान दिली" वगैरे.

आता तुम्ही म्हणाल - ह्यात काय आलंय खास? काय घेणं देणं आहे आपल्याला आणि गणितींना ह्या पडक्या मंदिरातल्या शिलालेखाशी आणि त्यासाठी मिळालेल्या ह्या जमिनीशी? जर मंदिरच वापरात नाहीये तर मग काय फरक पडतोय देवाला हार मिळत आहेत की नाहीत [आणि ती जमीन सध्या कोणी हडप केलीये!]. बरोबर आहे ना? अजिब्बात नाही - पुन्हा एकदा तो शिलालेख वाचा.

 à¤¹à¥à¤¯à¤¾ शिलालेखाची खासियत म्हणजे जगातले पहिले - होय - जगातील पहिले - लिखित शून्य (०) ह्या शिलालेखात आहे! ह्या शिलालेखाची अजून एक खासियत म्हणजे लिहिलेले सर्व आकडे दशमान पद्धतीने (जी आपण सध्या सर्रास वापरतो) लिहिलेले आहेत. संवत ९३३ म्हणजे इ स ८७६ मध्ये लिहिलेला हा शिलालेख आहे. ह्या शिलालेखातून सिद्ध होते की भारतात दशमान पद्धत (एकक - दशक - शतक इत्यादी) आणि शून्याचा उपयोग कमीतकमी अकराशे वर्षांपासून प्रचलित होता. 

शून्य ह्याचा संस्कृतमध्ये अर्थ होतो 'काही नाही' अथवा 'रिकामे'. अरबांनी ह्याला 'झीफर' म्हटले. अरबी शब्द 'सीफारा' म्हणजे 'रिकामे असणे' ह्यावरून 'झीफर' हा शब्द त्यांनी योजला. युरोपमध्ये शून्य ही संकल्पना पोहोचायला तब्बल सतरावे शतक उजाडावे लागले. तोपर्यंत ते अशास्त्रीय आणि कीचकट रोमन आकड्यांची पद्धत ( I, II, III, IV...X इत्यादी) वापरत होते. लॅटीनमध्ये हे अरबी झीफर 'झेफरीयम' म्हणून आले - पुढे फ्रेंचमध्ये त्याचे 'झेरो' झाले आणि त्यातून इंग्रजी 'झीरो'. अजूनही बरेचदा इंग्रजीत शून्याला 'नॉट' (nought) म्हटले जाते आणि ह्या नॉटचा अर्थ पण मूळ संस्कृत शब्दानुसार 'रिकामा' असाच आहे!

चतुर्भुज मंदिरातील हा शिलालेख शोधण्याचे श्रेय सर अलेक्झांडर कनिंगहमला जाते. हा माणूस आर्कीओलॉजीकल सर्वे ऑफ इंडियाचा संस्थापक होता. भारतभर फिरून त्याने त्याचे रिपोर्ट लिहिले ज्यामधून जगाला भारतातील पुरातत्त्व खजिन्याची ओळख झाली. त्याच्या 'Four reports made during the years 1862-63-64-65' (खंड २ - भाग १६)  à¤®à¤§à¥à¤¯à¥‡ ह्या मंदिराचा उल्लेख आहे. १८७१ मध्ये त्याचे हे पुस्तक प्रकाशित झाले आणि शून्याचा जनक भारत होता ह्यावर शिक्कामोर्तब झाले. तेव्हापासून (आपल्याला माहित नसते पण) जगभरातले गणिती हेच आद्य शून्य बघायला ग्वाल्हेरला चतुर्भुज मंदिरात जातात!

- संकेत कुलकर्णी (लंडन)

चतुर्भुज मंदिर - शिलालेख - "९३३" - "२७०" - "१८३" - "५०"